राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमच्या देवदेवतांबद्दल एवढी चीड का? भाजपा

 

शाळेत देवी सरस्वतीऐवजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांचा फोटो लावावा. याच फोटोंची शाळेत पूजा करा, असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भुजबळ यांच्या या विधानावरुन आता वाद होण्याची शक्यता असून या विधानावर भाजपा आक्रमक झाली आहे

भुजबळ म्हणाले की, शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी ‘तीन टक्के’ लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची,’ असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. अधिक बोललो असेल तर माफ करा, असे सांगत या महापुरुषांची आणि त्यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या विधाननंतर भाजप नेते राम कदम यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमच्या देवदेवतांबद्दल एवढी चीड का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना आमचे देव आणि देवतांबाबत एवढी चीड का ? हा खरा सवाल आहे. आज आमच्या देवी-देवतांचे फोटो खटकतात. उद्या आमची मंदिरेही खटकतील. उद्या मंदिरे कशाला पाहिजेत, तीही पाडून टाका म्हणतील’, अशा शब्दात राम कदम यांनी टीका केली.

Team Global News Marathi: