राष्ट्रवादीचा पडलेला आमदार आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी झेंडे लावतोय – योगेश कदम

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यावर पहिल्यांदाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. केवळ माझा मित्र म्हणत आदित्य ठाकरे यांनी येथील शिवसैनिकांवर व आपल्यावर कसा अन्याय केला, यावरुन योगेश कदमांनी खडे बोल सुनावले. १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेत अनेक गोष्टी आपण उघड करणार असल्याचा थेट इशाराच योगेश कदम यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर योगेश कदम बोलत होते.


दापोलीत आदित्य ठाकरे यांच्या सभेला राष्ट्रवादीचा पडलेला आमदार झेंडे लावण्यासाठी बाहेर पडला आहे. गेली सहा वर्ष जे शिवसेनेच्या विरोधात काम करत आहेत, ज्यांनी भगवे झेंडे जाळले, ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या नियोजनाच्या बैठकीला उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर जर आदित्य ठाकरे दौरा करणार असतील, तर दापोली मतदारसंघातील त्यांची परिस्थिती मला वेगळी सांगण्याची गरज नाही, असंही योगेश कदम म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यापूर्वी झालेल्या दापोलीतील जाहीर सभेत माझा ‘मित्र’ म्हणून उल्लेख केला, पण त्या दोन महिन्यानंतर झालेल्या बैठकीत दापोलीची सीट राष्ट्रवादीला गेली तरी चालेल, पण आमदार योगेश कदम संपला पाहिजे हे कारस्थान रचले गेले, माझ्यावर सातत्याने अन्याय होत होता, त्यावेळी मला मित्र म्हणवणाऱ्या आदित्य ठाकरे यांना माझ्यावर होत असलेला अन्याय कळला नाही का? असा खडा सवाल आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: