शिवसेना पाठोपाठ एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, अनेक कार्यकर्त्यांचा गटात प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांनी महाविकास आघाडीतून काढता पाय घेतल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर शिवसेनेत गळती लागल्याचं पाहायला मिळालं.आमदारांपाठोपाठ खासदार, नगरसेवक, पदाधिकारी अशा अनेकांनी सेनेची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकनाथ शिंदेंच्या या बंडाचा फक्त सेनेलाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

आता याचाच परिणाम म्हणजे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. 2 माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. जिल्हाध्यक्ष, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेविका स्वप्ना गावडे यांच्यासह 150 ते 200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत.

यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे पक्षाला खिंडार पडलं असल्याचं सांगितलं जात आहे.

Team Global News Marathi: