कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ; राज्यात कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं मोठं विधान

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा झपाट्याने वाढ; राज्यात कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं मोठं विधान

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज साडे पाच हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत आज तीन हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना निर्बंधांसह, संभाव्य धोका आणि उपाययोजनांबाबत चर्चा झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे.

‘राज्यातील रुग्णवाढ ही चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. कठोर निर्बंधांबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. तो निर्णय एक-दोन दिवसातच घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर दिली आहे. हे नक्कीच आहे की गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दी नको कारण त्यामुळे संसर्ग झपाट्याने वाढेल. टेस्टिंग संदर्भात एसजीटीएफ हे कीट आहे. त्यातून ओमिक्रॉनचं डिटेक्शन होतं. ते किट वापरलं जावं, त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण किती आणि ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण किती हे समजेल. तर ट्रिटमेंटवर ‘मोनोपिरॅमिल’ हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील टास्क फोर्सनं मान्य केलेलं अ‍ॅन्टी व्हायरल औषध आहे. त्याची मागणी आणि पुरवठा याबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहितीही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतही निर्णय

लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र सरकारनं १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्यानं करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लर न घेतलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आवाहन

३१ डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहनही टोपे यांनी यावेळी केलं आहे.

मुंबईची वाटचाल पुन्हा लॉकडाऊनकडे?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर देखील चिंता निर्माण झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल ३६७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईत आज ३,६७१ रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा २,५१० इतका होता. गेल्या २४ तासांत ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९६ टक्क्यांवर आलं आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ११,३६० वर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५०५ दिवसांवर आला आहे. रुग्णवाढीचा दर काल ०.१० टक्के इतका होता. आज त्यात वाढ होऊन ०.१४ टक्के इतका झाला आहे. मुंबईतील सातत्यानं होणारी रुग्णवाढ आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

कोरोनाचा स्फोट! देशात ३३ दिवसांनंतर एकाच दिवसात १०,००० हून अधिक रुग्ण

सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ८२,००० एवढी आहे. यातच गेल्या २४ तासांत देशभरात १० हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. याच वेळी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढताना दिसत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, देशातील ८ जिल्ह्यांमध्ये सकारात्मकता दर १० टक्क्यापेक्षा जास्त आहे. याच वेळी, १४ जिल्हे असे आहेत जेथे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट ५-१० टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात ९ डिसेंबरला पॉझिटिव्हिटी रेट ०.७६ टक्के एवढा होता, तो आता २.३
टक्के झाला आहे. याचप्रमाणे, बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट १.६१ टक्के होता, तो वाढून ३.१ टक्के झाला आहे. तसेच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के होता, तो आता १ टक्के झाला आहे.

देशात ९६१ रुग्ण ओमायक्रॉन बाधित

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील १२१ देशांमध्ये एका महिन्यात ३,३०,००० हून अधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण समोर आले आहेत. ओमिक्रॉनमुळे आतापर्यंत ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास, येथे आतापर्यंत ९६१ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी ३२० रुग्ण बरेही झाले आहेत. दिल्लीत ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे आतापर्यंत २६३ प्रकरणे आढळून आली आहेत. पण यापैकी ५७ रुग्ण बरेही झाले आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे २५२ रुग्ण आढळून आले आहेत. तर गुजरातमध्ये ९७, राजस्थानमध्ये ६९, केरळमध्ये ६५, तेलंगणामध्ये ६२, तामिळनाडूमध्ये ४५, कर्नाटकमध्ये ३४, आंध्रमध्ये १६, हरियाणामध्ये १२, बंगालमध्ये ११, मध्य प्रदेशमध्ये ९, ओडिशामध्ये ४, उत्तराखंड, छत्तीसगडमध्ये ३, जम्मू-काश्मीरमध्ये ३, उत्तर प्रदेशमध्ये २, गोव्यात १, हिमाचलमध्ये १, लडाखमध्ये १, मणिपूरमध्ये १ आणि पंजाबमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: