राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणून दाखवावा; अजित पवारांची शेलक्या भाषेत टीका

राणेंनी उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणून दाखवावा; अजित पवारांची शेलक्या भाषेत टीका –

पुणेः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खास आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय, त्यांनी चांगलं काम करावं, असं म्हणत शरसंधान साधलं. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेले धुमशान अजूनही आरोप-प्रत्यारोप आणि टीकेमुळे कायम आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकणात आम्ही काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली. बंधारे बांधतोय. राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा तेही केंद्रात मंत्री आहेत. त्यांनीही निधी आणावा. कामे करावी. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय. त्यांनी चांगलं काम करून दाखवावं असं म्हणत अजितदादांनी राणेंवर शरसंधान साधले.

अजित पवार राज्यपालांबद्दल बोलताना म्हणाले की, राज्यपाल ही महत्वाची व्यक्ती आहे. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सातत्याने खबरदारी घेतोय. सातत्याने लोकायुक्तांकडे तक्रारी येतात. यामध्ये तथ्य असेल, तर वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल, तथ्य नसेल तर त्यांच्याही लक्षात येईल की हे चुकीच्या पद्धतीने तक्रारी करतात, म्हणत भाजपवर निशाणा साधला.

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अजित पवार म्हणाले की, काही लोक वेगळा प्रचार करत आहेत. काही जागा मी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आम्हाला यश आले नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या विचाराचे लोक निवडूण आणण्याचा प्रयत्न करतोय. हवेली पुणे, पिंपरी चिंचवडनंतर विचार करायचा झाल्यास सर्वात जास्त मतदान बारामती येथे झाले आहे. बारामती येथे सातशे मते असल्याचे त्यांनी सांगितले.

…तर कार्यक्रमालाच जाणार नाही

राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू नये म्हणून सभा, मेळावे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील काही मंत्री, आमदारच या नियमांना पायदळी तुडवत असल्याचे समोर आले आहे. तसे काही व्हिडीओ माध्यमांनी यापूर्वी सार्वजनिक केलेले आहे. नेत्यांच्या मुलांच्या विवाहसोहळ्यात तर कोरोना नियमांना सर्रासपणे लाथाडण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असलेल्या कार्यक्रमांनादेखील मोठी गर्दी झाल्याची काही उदाहरणे आहे. हाच मुद्दा घेऊन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. कोरोना नियम फक्त सामान्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल भाजपकडून केला जातोय. यामुळे सातत्याने होत असलेल्या टीकेमुळे अजित पवार यांनी गर्दी टाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५० पेक्षा जास्त नागरिक असलेल्या कार्यक्रमात उपस्थित न राहण्याचं त्यांनी ठरवलं आहे. एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर आधी किती लोक आहेत, कोरोना नियमांचे पालन होत आहे का? या बाबी विचारणार आहे; नंतरच कार्यक्रमाला जाणार, असं अजित पवार यांनी म्हटलंय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: