राणेंनी सरकारवर केले औषधाच्या टेंडर भ्रष्टाचाराचे आरोप

 

दिव्या चौधरी

राणेंनी सरकारवर केले औषधाच्या टेंडर भ्रष्टाचाराचे आरोप

नवी मुंबई- आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. सध्याचं सरकार शोषण करणारं असून कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. तसेच सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघडकीस आणणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

पत्रकार परिषदेत “या सरकारने कोरोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे. लसींचे टेंडर का रद्द केले?याचे उत्तर संजय राऊतांनी द्यायला पाहिजे” अशा प्रखर शब्दात नारायण राणे यांनी सरकारवर आरोप केला. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे या मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नसल्याची गंभीर टीका करत “संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात, मग सरकारनं सरळ केंद्रातच विलीन व्हावं”, असे ते यावेळी म्हणाले.

त्याचप्रमाणे सध्याच्या कोरोना स्थितीबाबत सांगताना ते म्हणाले, “सरकारने लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केले नाही, ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत, काहीच नाही. कोरोना संपवणं यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. उलट करोना या सत्ताधाऱ्यांना लाभदायक आहे. त्यांना यानिमित्ताने पैसे खायला मिळत आहेत”,असे खडेबोल राणेंनी सरकारविरोधात सुनावले.

तसेच न्यायालयासमोर मराठा आरक्षणाबत जी माहिती द्यायला हवी होती, ती या सरकारने दिलीच नाही असे सांगत मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा हा नौटंकी दौरा असल्याचा देखील आरोप नारायण राणेंनी यावेळी केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: