लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करताय? जरा थांबा…

लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोशल मीडियावर शेअर करताय? जरा थांबा…

नवी मुंबई- लॉकडाऊनमुळे आणि अनेक निर्बंधांमुळे आता ऑनलाईन व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोना लसीकरणासंदर्भातील प्रमाणपत्र आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर अपलोड करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एका चुकीच्या पोस्टमुळे देखील गुन्हेगारांच्या हाती महत्वाची माहिती लागू शकते. सरकारकडून कोरोना लसीकरणानंतर देण्यात येणारे प्रमाणपत्र नागरिक ऑनलाइन माध्यमांवर उत्साहाने पोस्ट करत आहेत. या प्रमाणपत्रावर लस घेणाऱ्या व्यक्तीची बरीच खासगी माहिती असते. त्यामुळे सरकार लसीकरणाचे प्रमाणपत्र कोणत्याच सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट न करण्याचे आवाहन करत आहे.

कोरोना लसचा डोस घेतल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून लसीकरणाचं प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र नागरिक उत्साहात सोशल मीडियावर पोस्ट करतात. मात्र या प्रमाणपत्रावर कोरोना लसबाबतच्या माहितीबरोबरच व्यक्तीचे नाव, वय यांसारख्या अनेक खाजगी माहितीचा समावेश असतो.

 

या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे सरकारकडून सतर्कतेचा इशारा देत सोशल मिडियावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र पोस्ट करू नये असे सांगण्यात येत आहे.

सरकारने सोशल नेटवर्किंगबाबत सूचना देण्यासाठी सुरु केलेल्या सायबर दोस्त या ट्विटर हॅण्डलवरुन हे प्रमाणपत्र सोशल नेटवर्किंगवर पोस्ट न करण्याचे आवाहन केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: