राज्यसभेसाठी आज मतदान, महाविकास आघाडी निश्चिंत

 

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठविण्यात येणाऱया सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, कॉँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व डॉ. अनिल बोंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार असून ही जागा निवडून आणण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर राहत बहुतांश अपक्ष आमदार व छोटय़ा पक्षांनी सत्ताधारी पक्षांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतल्याने मविआ निश्चिंत आहे, तर विरोधकांच्या गोटात कमालीची अस्वस्थता असून भाजप नेते बेचैन झाले आहेत

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार उभे असून निवडणुकीतील चुरस वाढली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱया शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी एक असे तीन तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ही जागा निवडून आणण्यासाठी एक-एक मत महत्त्वाचे असून एकही मत वाया जाऊ नये तसेच कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.

एकामागून एक बैठकांची सत्रं सुरू आहेत. महाविकास आघाडीकडे असलेली अतिरिक्त मते तसेच अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या आमदारांकडून मिळणारा वाढता पाठिंबा लक्षात घेता शिवसेनेचे संजय पवार सहाव्या जागेसाठी निर्णायक मतांचा टप्पा सहज गाठतील असा विश्वास आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे मविआचा चौथा उमेदवारही राज्यसभेच्या या निवडणुकीत सहज बाजी मारेल.

Team Global News Marathi: