“राज्यपालांच्या खांद्यावर फडणवीसांची बंदूक” संजय राऊतांनी साधला निशाणा

 

भाजपला दाऊदच्या नावाने राजकारण करायचे आहे व त्यासाठी त्यांनी विधिमंडळात घटनेचा बळी दिला. मुख्य म्हणजे राज्यपालांनी त्यास साथ द्यावी हे देशाचे दुर्दैव. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात व शिवराय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करून निघून जातात. सत्ता गेली याचा इतका राग इतिहासात कोणी केला नसेल, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे.

अग्रलेखात राऊत म्हणतायत की, ‘महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे राज्यपाल वागत असून राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहेत ते सर्व फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे १७० चे बहुमत कायम आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे? महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधाने केली.

सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी केलेले विधान समस्त स्त्रीवर्गाची मान खाली जावी असेच आहे. राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरूचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. याची लाज भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते असा टोला सुद्धा लगावला आहे.

Team Global News Marathi: