राज्यात अराजक सदृश्यस्थिती, एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

 

हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली आहे. राणा विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेऊन राणा विरुद्ध सेना संघर्ष पेटला आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली असून, राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली असून, एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे म्हटले आहे.

भाजपच्या सर्व आमदारांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच मोहित कंबोज यांच्याबाबत शुक्रवारी रात्री झालेल्या प्रकरणावरून सरकारचा समाचार घेतला. मोहित कंबोज रस्त्यावरुन जात असताना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नवनीत राणा यांच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांना जाण्याची मुभा दिली. राज्यात गुंडगिरी सुरु असून, ही सरकार पुरस्कृत गुंडगिरी असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला.

ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या समोर गुंडगिरी करत आहेत. महाराष्ट्रात पोलिसांच्या समोर एवढी दहशत कधीच झाली नव्हती. या गुंडगिरीचे समर्थन शिवसेनेचे नेते करत आहेत. असा प्रकारचे समर्थन करणार असाल तर समोरचे कार्यकर्ते हातबांधून बसणार नाहीत. सध्या राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. अलीकडील काळातील जर सर्व कृत्य पाहिली तर एका सेकंदात राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी स्थिती आहे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी हल्लाबोल केला.

Team Global News Marathi: