राज्यात ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अजित पवारांचा शिंदे सरकारवर निशाणा

 

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या ४५ दिवसात राज्यात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असल्याचे अजित पवार म्हणाले. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केलं पाहिजे. आताच्या सरकारमधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घ्यावं, असा सल्लाही अजित पवारांनी दिला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पवार साहेबांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण केलं, हे आपण पाहिलं आहे. मदतीसाठी राज्यातला शेतकरी फार आशेनं सरकारकडे बघत आहे. तुम्ही-आम्ही जनतेचं प्रतिनिधित्त्व करताना आत्महत्या होणं ही लाजिरवाणी बाब आहे. हे सरकार निष्क्रिय नाही हा विश्वास जनतेला, बळीराजाला द्या असेही अजित पवार म्हणाले.

सभागृहात केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुसान झालं आहे. त्यामुलं राज्यात ओला दुष्काळ जाहीर केल्यास त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही अजित पवार म्हणाले. अतिवृष्टीमुळं ज्या भागातील जमिनी खरडून गेल्या, पिकं वाहून गेली अशा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करावं. शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी. खावटी अनुदान पैशाच्या रूपात द्यावं अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

Team Global News Marathi: