राज्याच्या सत्तासंकटात आता शिवसेना-काँग्रेसचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आलेला असताना आता शिवसेना आणि काँग्रेस  नेत्यांमध्येच जुंपलेली पाहायला मिळत आहे. वांद्रे पूर्वमधल्या गव्हर्नमेंट कॉलनी रिडेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेना नेते तसंच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

अनिल परब यांनी ही नौटंकी बंद करावी, असं ट्वीट झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे. काय आहे वाद? वांद्रे पूर्वमधल्या गव्हर्नमेंट कॉलनीची रिडेव्हलपमेंट होणार आहे. यामध्ये वर्षानुवर्षे तिकडे राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरासाठी एक प्लॉट देण्यात यावा. यासाठी शिवसेनेने बरीच आंदोलनं केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली, तसंच उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव घेतला जावा, अशी मागणी मी केली आहे, असं अनिल परब आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर म्हणाले.

अनिल परब यांच्या या घोषणेनंतर झिशान सिद्दीकी चांगलेच आक्रमक झाले. मी आमदार झाल्यापासून विधिमंडळात गव्हर्नमेंट कॉलनीचा मुद्दा उचलून धरला आहे. तेव्हा अनिल परब गायब होते. आता सरकार अडचणीत असताना एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर अनिल परब यांना वांद्रे पूर्वमधल्या लोकांची आठवण येत आहे? ही नौटंकी बंद करा. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठीची लढाई मी लढत राहीन, असं ट्वीट सिद्दीकी यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: