‘राजीनामा द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील’, शिंदे गटातील खासदाराला धमकी

 

नगर | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे बरेच खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. आता शिवसैनिकांच्या नाराजीतून शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखाने खासदाराला राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच राजीनामा दिली नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा जिल्हा प्रमुखाने दिला आहे. संबंधित प्रकरण हे शिर्डीतलं आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ऐनवेळी शिवसेनेने खासदारकीची उमेदवारी दिलेल्या सदाशिव लोखंडे यांना शिर्डीतील मतदारांनी दोनदा खासदार बनवलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याची आवई उठवणारे सदाशिव लोखंडे आता मात्र शिंदे गटात सामील झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 2014 साली शिवसेनेचे बबनराव घोलप शिर्डीचे खासदारकीचे उमेदवार होते.

मात्र न्यायालयीन अडचणींमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही. निवडणूक अगदी सतरा दिवसांवर आलेली असताना भाजपात असणाऱ्या सदाशिव लोखंडेंना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि अवघ्या सतरा दिवसांच्या संपर्कात लोखंडेंना शिवसैनिकांनी खासदार केले. 2019 सालीही सदाशिव लोखंडेंनाच शिवसेनेने पुन्हा खासदार केलं. गेल्या महिन्यात शिंदे गटाविरोधात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत मोर्चा काढण्यात आला होता.

त्यांनी मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होत. आता मात्र सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिर्डीतील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. “आम्ही रक्ताचे पाणी करून तुम्हाला खासदार केलं आणि तुम्ही धनुष्यबाणाचा अपमान केलाय.
त्यामुळे तुम्ही आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या. नंतर निवडून येवून दाखवा. निवडून आलात तर मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईन”, असं आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिलं आहे. तसेच राजीनामा न दिल्यास त्याचे वाईट परीणाम भोगावे लागतील, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

सुषमा अंधारें लवकरच करणार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

स्मृती इराणींच्या मुलीच्या रेस्टॉरंटमध्ये बीफ? तर काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी

Team Global News Marathi: