राजस्थान,छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

 

मुंबई | शासकीय सेवेत २००५ पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलनंही केली आहेत. मात्र यावर कुठलाही निर्णय सरकारकडून झालेला नाही. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू घेत एक ट्वीट केलं आहे. राजस्थान, छत्तीसगढ राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे, असं ट्वीट नाना पटोलेंनी केलं आहे.

पटोले यांच्या या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’आपली ही घोषणा लाखो शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील अंधकार दूर करणारी आहे. ही योजना लागू करून आपण कायम सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करता, हेच अधोरेखित होईल. यामुळे अनेक हुशार तरुण शासकीय सेवेत येण्यास प्रवृत्त होतील, असं अशोक दुधे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांनी म्हटलं आहे की, हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची ताकद आपल्यामध्ये आहे याची आम्हाला १००% खात्री आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण हा निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी पाठपुरावा करावा ही विनंती, असं खोसेंनी म्हटलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी याआधी राज्यभर आंदोलनं केली आहेत. २००५ पासून दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळणार नसल्याने वृद्धपकाळात संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.

Team Global News Marathi: