राजन साळवी घेणार आज उद्धव ठाकरेंची भेट, या विषयावर होऊ शकते चर्चा

 

मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या.मात्र या चर्चांवर स्वतः साळवी यांनी पूर्णविराम लावत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे ते म्हणाले. या सर्व घडामोडी सुरु असताना राजन साळवी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज्यातील विविध ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं यश मिळालं आहे.

रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर आज राजन साळवी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या या भेटीदरम्यान इतर देखील काही विषयांवर चर्चा होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. उदय सांमत यांच्याविरोधात विधानसभेला राजन साळवी यांना ठाकरे गटाकडून संधी मिळणार अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे साळवी यांची उद्धव ठाकरेंसोबतची भेट महत्त्वाची मानली जाते.

Team Global News Marathi: