ठाणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ५ जूनला आयुध दौरा करणार भरल्याचे जाहीर केले होते या त्यांच्या घोषणेनंतर सर्व मनसे सैनिकांनी राज्यभरात बॅनर लावून या निर्णयाचे स्वागत केले होते तर ठाण्यात लागलेल्या बॅनरने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘राज तिलक की करो तैयारी आ रहे हे भगवाधारी… चलो अयोध्या..’ असा मजकूर लिहिलेले फलक सध्या ठाण्याच्या विविध भागांत मनसेकडून लावण्यात आले आहेत. अंगावर भगवी शाल परिधान केलेल्या राज यांच्या बॅनरवरील फोटोमुळे ठाणेकरांना ३५ वर्षांपूर्वीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होत आहे.
भगवी शाल अंगावर परिधान केलेल्या राज यांच्या फोटोमुळे ठाणेकरांच्या १९८७ सालातील जुन्या आठवणी जागृत झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळी ठाण्यात आले असता, अशीच भगवी शाल परिधान करून त्यांचा सन्मान केला गेला होता. राज यांचा फोटो त्या फोटोशी साधर्म्य असणारा आहे, असे जुने शिवसैनिक खासगीत सांगत आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज यांनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ गेले काही दिवस व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते केंद्र सरकारमधील मंडळींना देशात जातीय दंगे घडवून आणायचे असल्याचा दावा करीत असून, हिंदू व मराठी मुसलमान यांनी अशा कपटी डावपेचांपासून सावध रहावे, पोलिसांनी सतर्क रहावे, असे आवाहन करीत आहेत. याउपर कुणी दंगे घडवण्याचा प्रयत्न केल्यास मी आहेच, असा इशारा देताना दिसतात.
या भूमिकेपासून पूर्णपणे फारकत घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्यातील उत्तर सभेत त्यांचे स्वागत करताना त्यांना भगवी शाल पांघरायला दिली. राज यांच्या उजव्या खांद्यावरून शाल डाव्या खांद्यावर घातली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही ठाण्यात असेच भगवी शाल देऊन स्वागत केले जात होते. लागलीच त्याच भगव्या शालीतील फोटोंसह राज यांची पोस्टर्स ठाण्यात लागली.