राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या डॉक्टरचं घर चोरट्यांनी फोडलं

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक सेलिब्रिटी अभिनेत्यांचे डेन्टीस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर संदेश मयेकर यांच्या घरी चोरी झाली आहे. सोमवारी पहाटे चोरीची ही घटना घडली. या चोरीप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जातो आहे.

डॉक्टर संदेश मयेकर हे मुंबईतील एक प्रसिद्ध डेन्टिस्ट आहेत. मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत अनेक नेते, अभिनेते त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असतात. डॉक्टर संदेश मयेकर यांच्या घरी चोरी झाल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबईतील वांद्रे येथे संदेश मयेकर यांचं घर आहे. वांद्रे पश्चिमेच्या बॅन्ड स्टॅन्ड या भागात राहत असलेल्या संदेश मयेकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारला आहे.

चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून या चोरीप्रकरणी पंचनामा केला जातो आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, घरातून नेमकं काय काय चोरीला गेलं, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. डॉक्टर संदेश मयेकर यांच्या घरातून नेमकं काय काय चोरीला गेलंय, याचा तपास केला जात आहे.

Team Global News Marathi: