राज ठाकरेंनी पुरंदरे भक्तीतून बाहेर पडावं – श्रीमंत कोकाटे

 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेत आणि ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. महाराष्ट्रात जातीवादाचं विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

तसंच शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केला होता. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरुनही राज यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसंच इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचं नाव घेत त्यांच्यावरही टीका केली होती. त्यावरुन आता श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. कोण ते कोकाटे समजून घेण्यासाठी राज ठाकरेंनी माझं भाषण ऐकायला यावं, असा खोचक सल्लाही कोकाटे यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

कोकाटे म्हणाले की, कोण कोकाटे ते समजून घेण्यासाठी राज ठाकरे यांनी माझं भाषण ऐकायला यावं. तसंच कोकाटेच्या वर्गाला येऊन बसावं म्हणजे त्यांना समजेल कोकाटे कोण ते, असं आव्हानच कोकाटे यांनी राज यांना दिलंय. राज ठाकरे यांना खरं शिवचरित्र माहिती नाही. त्यांनी पुरंदरे भक्तीतून बाहेर पडावं. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेली पुस्तकं वाचण्याची गरज आहे, म्हणजे त्यांचे गैरसमज दूर होतील, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने कोकाटे यांच्या भाषणाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Team Global News Marathi: