राज ठाकरे घेणार तीन सभा, एक मुंबई तर दोन कोकणात

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई आणि कोकणात सभा घेणार आहेत. ते मुंबईत एक तर, कोकणात दोन सभा घेणार आहेत. रेल्वे भरतीदरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीविरोधात अ‌ॅड. मिथिलेशकुमार पांडे यांनी दिल्लीत दाखल केलेल्या याचिका मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा पांडे यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली.

या पत्रकार परिषदेनंतर पांडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चादेखील केल्याचे ते म्हणाले. मनसेच्या पक्षनिर्मितीच्या वेळी महाराष्ट्रात विविध आंदोलने झाली. त्यावेळी राज ठाकरे यांची भाषणे चुकीच्या पद्धतीने देशभरात जात होती. त्यामुळे आम्ही उत्तर भारतीयांविरोधात आहोत असे सर्वत्र पसरविण्यात आले. त्यादरम्यान अनेक राज्यांत राज ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकाही होत्या. मात्र या याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे नांदगावकर म्हणाले .

महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाविषयी राज ठाकरे यांनी पूर्वीच भाष्य केल्याचे नांदगावकर म्हणाले . कर्नाटकचे मुख्यमंत्री निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत. मात्र हे करणे योग्य नाही, असे नांदगावकर म्हणाले. महाविकास आघाडीतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाविषयीही त्यांनी आपले मत मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. त्याविरोधात मोर्चा काढला जात असून त्यात सहभागी व्हायला हवे असे नाही. याबाबत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका जाहीर करतील. तसेच लव्ह जिहाद कायदा आणला पाहिजे, असे नांदगावकर म्हणाले.

Team Global News Marathi: