राज ठाकरे -देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांची भेट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला उधाण

 

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत. राज ठाकरे यांनी दिवाळीच्या मुहूर्तावरनव्या घरात राहायला गेले. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे अनेक नेते राज यांच्या भेटी घेत आहेत. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता यांच्यासह राज यांच्या नव्या घरात पोहोचले. या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

काही दिवसांपूर्वीच राज यांनी त्यांचा मुक्काम कृष्णकुंजवरून शिवतीर्थावर हलवला आहे. राज यांचं नवं निवासस्थान जुन्या घराच्या शेजारीच आहे. राज यांनी नव्या घरात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिवाळीला राज यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर प्रसाद लाड राज यांच्या भेटीला गेले होते. लाड हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.

शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत घरोबा करत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप एकाकी पडला. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपला एका साथीदाराची गरज आहे. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. त्यामुळे मनसेची मदत मिळाल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. भाजपला मनसेसोबत थेट युती करण्यात अडचणी आहेत. .

Team Global News Marathi: