“गाडी उशिरा आल्यास रेल्वे जबाबदार, द्यावी लागणार भरपाई”

 

नवी दिल्ली | रेल्वे गाड्यांना होणारा उशीर आणि वेळेपेक्षा जास्त उशिरा पोहचणायचा अनुभव अनेक रेल्वे प्रवाशांना आलाच आहे. याबाबत दाद कोणाकडे मागायची आणि फिर्याद कोणाकडे करायची असेच वाटते.पण आता सर्वोच्च न्यायालयाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबाबाबत कठोर भूमिका घेतली असून गाड्यांच्या उशिरा येण्याने कोणत्याही प्रवाशाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे. यासाठी रेल्वेला प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल.

रेल्वेला उशीर प्रकरणी एका प्रवाशाला ३०,००० रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. “ट्रेनला उशीर झाल्यास रेल्वे आपली जबाबदारी झटकू शकत नाही. रेल्वे प्रवाशांना विलंबाचे कारण कळवण्यास अपयशी ठरली तर प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल”असा निकाल न्यायालयाने दिला आहे. प्रवाशांचा वेळ अमूल्य आहे आणि उशीर झाल्यास कुणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल,असे मत देखील सुप्रीम कोर्टातील खंडपीठाने नोंदवले.

संजय शुक्ला ११ जून २०१६ रोजी अजमेर-जम्मू एक्स्प्रेसने आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. ही ट्रेन सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती. मात्र ट्रेन १२ वाजता नियोजित ठिकाणी पोहोचली. त्यामुळे १२ वाजता जम्मू विमानतळावरून सुटणारे विमान निघून गेले.
त्यामुळे कुटुंबाला जम्मू ते श्रीनगर असा प्रवास टॅक्सीने करावा लागला. या प्रवासासाठी त्यांना १५ हजार रुपये मोजावे लागले. तसेच हॉटेलमध्ये राहण्यासाठी १० हजार रुपयांचा वेगळा खर्च आला. या नाहक त्रासामुळे शुक्ला यांनी ग्राहक पंचायतीकडे धाव घेतली होती. यानंतर, अलवर जिल्ह्याच्या ग्राहक मंचाने उत्तर पश्चिम रेल्वेला संजय शुक्ला यांना ३०,००० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.

Team Global News Marathi: