‘पुण्यातल्या पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी’; मनसेचा दावा

 

देशात सध्या ज्ञानवापीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आजपासून जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. एकीकडे ज्ञानवापीचा मुद्दा तापत असताना आता पुण्यातील पुण्येश्‍वर आणि नारायणेश्‍वर मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या दोन मंदिरांच्या जागेवर छोटा शेख व बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत, या दर्ग्यांच्या ठिकाणी असलेल्या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी या पुढच्या काळात लढा उभा केला जाईल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी काल जाहीर केलं आहे.

कालच्या सभेत बोलताना अजय शिंदे यांनी म्हटलं की, पुण्येश्वराला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिलजीचा एक सरदार बडा अरब पुण्यावर चाल करुन आला त्यावेळी त्यानं हे भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. एक मंदिर नाही तर दोन मंदिरं उध्वस्त केली. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरं उध्वस्त केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही दोन्ही मंदिरं कुठं आहेत.

एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे. तर दुसरं मंदिर लालमहालाच्या पलीकडील बाजूला कुंभार वेसजवळ आहे. जिथं आज छोटा शेख दर्गा आहे. या सगळ्या मंदिरांच्या वर मशिदी निर्माण झाल्या आहेत, असा दावा अजय शिंदे यांनी केला आहे. अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेची नेमकी भूमिका काय असेल याकडे लक्ष असणार आहे.

Team Global News Marathi: