पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर सरकार विरोधात कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन

 

पुणे | एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी कर्मचारी वर्गाने संप पुकारला आहे तर दुसरीकडे राज्य सरकार त्यावर योग्य मार्ग काढणार असल्याचे सांगूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यास सुरुवात झाली आहे.

कालपासून ९०० पेक्षा जास्त कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. तरीही कर्मचाऱ्यांनी संप सुरु ठेवला आहे. अनेक जिल्ह्यात या मागणीसाठी संपाबरोबरच आंदोलनही केले जात आहे. पुण्यात काल कर्मचाऱ्यांकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. तर आज सकाळी त्यांनी मुंडन करून आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आज कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीला जवळ जवळ ७,९५१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यात आता संपामुळे एसटी महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा हा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आता चांगलाच चिघळला असून राज्यात बुधवारी दिवसभरात २५० आगारांपैकी २५० आगार बंद पडले आहेत. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटीला बसला. तर संपामुळे दररोज १३ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाचा गाडा पूर्वपदावर येत असतानाच ऐन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे दररोज १३ कोटींचे नुकसान होत आहे. या संपामुळे एसटीचा संचित तोटा हा तब्बल साडेबारा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. तर कर्मचारी संपामुळे बुधवारी एसटीचे २५० पैकी २५० आगार बंद होते.

Team Global News Marathi: