पुण्यातील खाजगी कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पीएमपीएमएल बस मध्ये सवलतीच्या दरात पास

पुणे:- शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये आता सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची येत्या १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा पीएमपीच्या बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

पीएमपीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकारांसोबत बोलताना ही माहिती दिली. या वेळी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर, मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, अभियंता रमेश चव्हाण, दत्तात्रय झेंडे, सतीष गाटे आदी उपस्थित होते. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीकडून बससेवा पुरविली जाते. पीएमपीच्या ताफ्यात दोन हजारांहून अधिक बस आहेत. सद्यस्थितीत १७०० बसमधून दिवसाला १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रवाशांना पीएमपीकडे आकर्षित करण्यासाठी नवीन अध्यक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आता खासगी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पीएमपीकडून याआधी केवळ शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे ओळखपत्र तपासून सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून दिले जात होते. शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात खासगी क्लासची संख्या मोठी आहे. हजारो विद्यार्थी दररोज प्रवास करतात. या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकडून स्वतःची वाहने किंवा इतर पर्यायी वाहनांना पसंती दिली जाते. मात्र, आता या विद्यार्थ्यांना सवलतीत पास मिळणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी पीएमपीने प्रवास करतील. यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होण्यास हातभार लागेल, असा विश्वास पीएमपी प्रशासनाला आहे.

शहरातील खासगी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांना आता सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Team Global: