पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

 

पुणे | पुणे महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सत्तेधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच पुणे महानगर पालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली असून संघटना बांधणीवर लक्ष देत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील पुण्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी सक्रिय झाले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होणार, असा दावाही पाटील यांनी केला. पुणे मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. तसेच मतदार यादी व बूथ कमिटी हे या सर्व संघटनात्मक बांधणीचा पाया असून, संपूर्ण पक्ष संघटना ही या पायावर मजबूतपणे उभी आहे. हा पाया अधिकाधिक भक्कमपणे मजबूत केल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर निवडणून येणार, असे पाटील म्हणाले.

यावेळी ‘संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी’ या संकल्पनेतून त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवाद यात्रेत वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात कार्यकर्त्यांनशी संवाद साधताना ते बोलत होते. यानंतर वडगावशेरी, हडपसर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या चारही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. यासाठी सर्व आजी-माजी नगरसेवक,सर्व सेल अध्यक्ष,कार्यकारणी सदस्य व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Team Global News Marathi: