पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले, “संधी मिळाली तर…”

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या मोठ्या बंडानंतर राज्यात पराकोटीचा सत्तासंघर्ष आठवडाभरापासून पाहायला मिळाला. यानंतर अखेरीस उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही यावर भाष्य केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोखठोक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली.

तसेच काही काँग्रेस नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असा मोठा दावाही केला आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी केलेल्या बंडखोरीमुळे हा मुद्दा बाजूला राहिला. यावर बोलताना, पक्षातील काही स्लीपर सेल झाकले गेले, असे म्हणता येणार नाही. मात्र, नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसमधील काही जणांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन ते सात काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केले आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली तर काँग्रेसमधूनही आमदार जाऊ शकतात, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनी सभागृहात येऊन बाजू मांडायला हवी होती आणि त्यानंतर राजीनामा द्यायला हवा होता. राज्यातील जनतेला त्यांची बाजू कळाली असती. विरोधी पक्षनेते तसेच आणखी काही नेत्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. आम्ही हे सरकार का स्थापन केले हे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगता आले असते. एक-दोन तास सभागृह चालले असते आणि नंतर निर्णय घेतला असता तर चालले असते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Team Global News Marathi: