Big Breaking : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Big Breaking : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

एकनाथ शिंंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली.

मुंबई, 30 जून : एकनाथ शिंंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली. “शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहेत. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही आहोत. कुठल्यातरी मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत नाहीयत. ही तत्त्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची लढाई आहे. म्हणून भाजपने निर्णय घेतलाय की, एकनाथ शिंदे यांना भाजप समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज संध्याकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचा शपथविधी होईल. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. यामध्ये शिवसेना आणि भाजपचे आमदार येतील. मी स्वत: बाहेर असेन, पण हे सरकार चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी असेल”, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा केली.

सर्वांना कल्पना आहे, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजप 105 जागा जिंकली आणि शिवसेना 56 जागा अशा 161 आणि काही अपक्ष मिळून 170 लोकं त्यावेळी निवडून आले होते. साहजिकच युतीचं सरकार स्थापन होईल, अशी आशा होती. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपचा मुख्यमंत्री बनेल, अशी घोषणा केली होती.

पण दुर्देवाने निकालानंतर तेव्हाचे आमचे शिवसेना नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला. विशेषत: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाच्या विचारांचा विरोध केला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपला बाहेर ठेवलं. हा खरंतर जनमताचा अपमान होता. जनतेने भाजप-सेना युतीला मतदान केलं होतं, पण त्या जनमताचा अपमान झाला आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: