महाराष्ट्राला त्वरित कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करा, खासदार राहुल शेवाळे यांची लोकसभेत मागणी

 

मुंबई | कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद असून केंद्र सरकारने त्वरित महाराष्ट्राला कोरोनावरील लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी खासदार शेवाळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत केंद्र सरकार देशभरातील नागरिकांना लवकरात लकवर लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती लोकसभेत दिली.

संसदीय अधिवेशनात लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला खासदार शेवाळे यांनी कोरोना लसीसंदर्भातील राज्यांसमोरील समस्या सभागृहासमोर मांडल्या. लसींच्या तुटवड्याच्या समस्येबरोबरच कोरोनावरील लस खरेदीसाठी राज्य सरकार आणि पालिकांना येणाऱ्या अडचणींबाबतही त्यांनी सभागृहाला अवगत केले. केंद्र सरकारने कोरोना लसीच्या ग्लोबल टेंडर संदर्भात समान नियमावली जाहीर करावी.

तसेच लस उत्पादक कंपन्यांना करात सवलत दिल्यास देशभरात कोरोनावरील लसींचे दर समान ठेवता येतील, अशी मागणीही खासदार शेवाळे यांनी केली. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना लसीसंदर्भातील केंद्र सरकारची भूमिका मांडली. यावर्षीच्या मे महिन्यातही खासदार शेवाळे यांनी या विषयासंदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली होती.

Team Global News Marathi: