उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशात मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार विरोधात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे बडे-बडे नेते आता उत्तरप्रदेशात दाखल होत आहेत. त्यातच या प्रकरणी घटनास्थळी जाण्यासाठी निघालेल्या समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले आहे.
मात्र प्रियांका गांधी यांचा सध्या एक विडिओ प्रचंड वायरल होत असून या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. प्रियंका गांधींना पोलिसांनी लखनौपासून ९० किमी अंतरावर असलेल्या सितापूर येथे स्थानबद्ध केलं आहे. प्रियंका गांधींचा पोलिसांसोबत संवाद आणि वाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसकडून आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
ज्यामध्ये, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींच्या हातात झाडू दिसत आहे. स्वत: झाडूने रुम साफ करतानाचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्यांना सितापूर येथील ज्या गेस्ट हाऊसमध्ये स्थानबद्ध केलंय, तिथला हा व्हिडिओ आहे. दरम्यान, या गेस्ट हाऊसच्याबाहेर काँग्रेस समर्थक जमले असून पोलिसांकडून अन्याय होत असून प्रियंका गांधींच्या सुटकेची मागणी ते करत आहेत
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे.