एकाच वेळी वृद्ध दाम्पत्याने सोडला प्राण; अंत्यसंस्कार ही एकाच चितेवर

नांदेड – अर्धापुरातील वृद्ध दाम्पत्याने जीवनभर एकमेकांना साथ तर दिलीच, त्यासोबतच एकाचवेळी दोघांनीही आपला प्राण सोडला. या दोघांनीही एकाच चिथेवर चिरविश्रांती घेतली. या पती-पत्नीच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेटीबा उमाजी कांबळे व राहीबाई यांचा सुखाचा संसार होता. आपल्या कौटुंबिक जीवनात एकमेकांना सावरुन आधार दिला. आपल्या जीवनात एकमेकांना साथ देणाऱ्या या जोडीने जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने राहत्या घरी राहीबाई कांबळे यांचे मंगळवारी (13 एप्रिल) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निधन झाले. तेव्हा शेटीबा कांबळे हे घरीच होते. पत्नीने साथ सोडली हे कळताच त्यांनी आपलाही प्राण सोडला.

या दोघांचे काही वेळाच्या अंतराने निधन झाल्याचे कळताच शेजारी, नातेवाईक अंत्यदर्शनासाठी आले. या शहरातील बौद्ध स्मशानभूमीत सायंकाळी एकाच चिथेवर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांनी एकत्र सुरु केलेल्या जीवनाच्या प्रवासाचा शेवट सुध्दा एकाचा वेळी झाला. एकमेकांनी एकत्र राहण्याचे वचन खऱ्या अर्थाने त्यांनी पूर्ण केले. अर्धापूर शहरातील ही पहिलीच घटना आहे. या दोघांच्या निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन मुलं, एका मुलीचा संसार

जिल्ह्यातील अर्धापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरात माजी ग्रामपंचायत सदस्य शेटीबा उमाजी कांबळे (वय 75) राहत होते. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकताना त्यांच्या पत्नी राहीबाई (वय 70) यांनी तितकीच मोलाची साथ दिली. या दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी आहे. या मुलांना कष्ट करून शिक्षण दिले. त्यांचा मोठा मुलगा सैन्यात सेवा करून निवृत्त झाला, तर छोटा मुलगा अर्धापूर नगरपंचायतमध्ये कर्मचारी आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: