प्रसिद्ध क्रिकेटर, खोतकरांचे जावई विजय झोल यांच्यावर फसवणुकीसह गंभीर गुन्हे दाखल

उद्योजकाला गुंडांच्या मदतीने धमकावल्याप्रकरणी किरण खरात यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई क्रिकेटर विजय झोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय झोल यांनी गेल्या १० ते १२ दिवसांपासून माझे अपहरण करून कोंडून ठेवल्याचा दावा किरण खरात यांनी केला आहे. आपल्याला ४ तारखेला पुणे येथून जालना येथे आणले आणि माझे घर, जालन्यातील ४ ते ५ प्लॉट्सची रजिस्ट्री बंदुकीचा धाक दाखवून करून घेतल्याचंही किरण खरात यांनी म्हटलं आहे.

किरण खरात यांच्या तक्रारीनुसार, खरात यांचे जालना येथील राहते घर आणि काही प्लॉट्स, मालमत्ता विजय झोल यांनी लिहून घेतली. तसेच अंबड येथील सुखसागर हॉटेल नावे करून देण्यासाठी तगादा लावला असून जिवे मारण्याची धमकी देत सतत दबाव टाकत असल्याचंही किरण खरात म्हणतात. क्रिकेटर विजय झोल हे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे जावई आणि जालन्याचे प्रसिद्ध वकील हरिभाऊ झोल यांचे पुत्र आहेत.

जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कालच पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. ‘काही गुंड किरण खरात यांना मारण्यासाठी त्यांच्या गावी मंगरूळ येथे गेले होते, मात्र गावकरी जमा झाल्याने दुर्घटना टळली. काल किरण खरात हे जालना येथे तक्रार देण्यासाठी येत होते. परंतु त्यांना पोलिसांनी अडवल्याने तक्रार दाखल झाली नव्हती,’ असा आरोप आहे. काल रात्री उशिरा घनसावंगी पोलीस ठाण्यात किरण खरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा तो कदम जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तसंच काल रात्रीच जालना पोलीस ठाण्यात किरण खरात यांच्याविरोधातही फसवणुकीची तक्रार दाखल झालेली आहे.

Team Global News Marathi: