प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर जाणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर इथे सुरू आहे. अशातच काल ठाण्यात शिरोमणी महाराज बिजली पासी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर आता शिंदे गट अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी शिंदे गट अयोध्येला जाणार अशी घोषणा शिंदे यांनी केली; परंतु नेमके ते अयोध्येला कधी जाणार? याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. महापालिका निवडणुकीच्या आधीच शिंदे गट अयोध्या दौऱ्याला जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतील, असे समजते. तसेच, शिंदे यांच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या आमदारांच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्ही लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात राहत आहात. उत्तर भारतातून आलेले आहात. आता महाराष्ट्र आणि उत्तर भारताची संस्कृती एकमेकात मिसळून गेलेली आहे. तुम्हीही महाराष्ट्रीयन झाला आहात. तुमच्यामुळे आम्हीही वारंवार अयोध्येला जात आहोत, असे ते म्हणाले. तसेच, आम्ही लवकरच अयोध्येला जाणार आहोत. याआधीही आम्ही रामाचे दर्शन घेतले होते. आता पुन्हा एकदा घेणार आहोत आणि घेत राहणार. अयोध्येत महाराष्ट्र भवन बनवावे म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे अयोध्येत लवकरच महाराष्ट्र भवन बनणार आहे, असेदेखील शिंदे यांनी सांगितले.

तसेच, पाच महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. आमच्या या निर्णयामुळे तुम्ही सर्व खूश आहात ना? तुम्हीच नाही संपूर्ण देश खूश आहे. आम्ही जिथे जिथे जातो. तिथे लाखो लोक येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लोक दोन दोन चार चार तास थांबत आहेत. तुमच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. आमचा निर्णय योग्य असल्याचे यातूनच दिसते. हे जनतेचे सरकार आहे. सर्व जातीपातींना सोबत घेऊन आम्हाला विकास करायचा आहे. तुम्ही जिथे जिथे असाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता मी मुख्यमंत्री आहे. तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, असेही ठामपणे शिंदेंनी सांगितले.

Team Global News Marathi: