महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालणार नाही – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालणार नाही – उद्धव ठाकरे

 

शिवसेनचा आज 56 वा वर्धापन दिन अंधेरीतील वेस्ट ईन हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून ते आताच्या परिस्थितीपर्यंत सर्वच गोष्टींवर भाष्य केलं.

”56 वर्ष झाली. य़ा वर्षातील अनेक गोष्टी आजही ताज्या आहेत. मी पहिल्यांदा जेव्हा पक्षप्रमुख पदाची सूत्र स्वीकारली तेव्हा नकळत एक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. तो म्हणजे 56 वर्षांपूर्वीचा स्थापनेचा क्षण. 1bhk मध्ये माझे आजोबा, माँसाहेब, काका, त्यांचे कुटुंब, आम्ही मुलं होतो. त्या घरात या पक्षाला सुरुवात झाली. मी आणि एखाद दोन जण आता असतील ज्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलं आहे. शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा माझं वय सहा वर्ष होतं. माझ्यासमोर स्थापनाचा नारळ फुटला होता. त्या नारळाचे शिंतोडे माझ्यावर पडले होते. तेव्हा वाटलं नव्हतं की ते शिंतोडे मला इतकं भिजवून टाकतील. एक फार मोठी जबाबदारी. वय लहान होतं. उत्साहाचं वातावरण तेव्हाही होतं आणि आताही आहे. ही जबाबदारी किती मोठी आहे हे तेव्हा नव्हतं कळलं. आपल्यासारखे साथी सोबती. जीवाला जीव देणारे सैनिक सवंगडी मिळाले. म्हणून हा जो एक प्रश्न होता की शिवसेनाप्रमुखानंतर शिवसेनेचं काय?त्याला आपण कणखरपणाने उत्तर देत आलो आहोत.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”शिवसेना 56 वर्ष पूर्ण करते आहे. नव्या दमाचे नव्या उमेदीचे शिवसैनिक दररोज येत आहेत. उद्याची निवडणूक आहेच. आजचं हे जे चित्र आहे. आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. पण मला हे जे चित्र दिसतंय ते याहून चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे. आज इथे आमदारांसोबत माझे कार्यकर्तेही इथे आहेत. या संख्येनुसार भविष्यात आपल्याला या संख्ये एवढेच आमदार दिसले पाहिजेत. आज मुद्दामून वेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करतोय. आमदार, मंत्री, मी स्वत: मुख्यमंत्री, 22 23 खासदार आहेत, आणखी पक्षाचं यश काय पाहिजे तुम्हाला. उद्या निवडणूक आहे. पण मी त्याचा विचार करत नाही.. जर का मी चिंता करत बसलो तर शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमन्यामध्ये भरवलेले आहे त्याचा उपयोग काय? राज्यसभेत आमच्या एकाही सहकाऱ्याचं मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं त्याचाही अंदाज लागलेला आहे. त्याचा हळू हळू उलगडा होईल. पण उद्याच्या राजकारणात ते उद्या कुणीच फुटणार नाही हे नक्की. आता शिवसेनेत एकही गद्दार राहिलेला नाही. एकदा मागे फाटाफूट झाली होती तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या शिवसेनेत नको, तसं मलाही नको” अशा शब्दात त्यांनी फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या भाजपला सुनावले आहे.

Video Player is loading.

Current Time 0:00

Duration 50:32

Remaining Time 50:32

‘मी कोण आहे? नुसत्या उद्धव ठाकरेला दीड दमडीची किंमत नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावासमोर समोरचा माणून आदराने उभा राहतो. मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही. कारण माझं जे नाव आहे ते कुणीच काढून घेऊ शकत नाही. शिवसेनेचा जन्मच झाला तो भूमीपुत्रांच्या न्यायहक्कासाठी आज जे हिंदुत्वाचे डंके पिटतायत. ज्यावेळी हिंदुत्वाचं नाव घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा हिंदू बोलणं गुन्हा समजला जायचा. आज जे चाललं आहे ते त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही. का पाहिजे मला सत्ता, मला राज्य पाहिजे पण जर राज्य मिळाल्यानंतर जर तुम्ही ते नीट काम करायला तयार नसाल तर तुम्ही नालायक आहात. आजसुद्धा आपण बघतो आहोत अग्निपथविरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. का पेटली त्यांची माथी? हृदयता राम व हाताला काम असं असलं पाहिजे हे मी म्हणालो होतो. हाताला काम नसेल तर नुसतं राम राम करुन उपयोग नाही”, असे ते म्हणाले.

”उद्याची निवडणूक ही आमच्यात फूट पाडू शकत नाही हे दाखवणारी आहे. तुम्ही देशात काय केलं तर महाराष्ट्र हा वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही. प्रत्येकाला पर्याय असतो. शेरास सव्वाशेर असतोच. आताचं राजकारण हे पावशेरचं चाललेलं आहे. तेवढ्यापुरता वेळ मारून न्यायची”, असा शब्दात त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले.

महाराष्ट्राचं पेटणं वेगळं असतं

देशभरात पेटापेटी झाली. पण महाराष्ट्रात झाली नाही. महाराष्ट्राचं पेटणं वेगळं असतं. महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा तो ज्याच्यासाठी पेटतो त्याला जळून खाक केल्याशिवाय राहत नाही. आपल्यापैकी कुणी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. मावळे जरी झालो तरी भरपूर झालं. त्य़ावेळी महाराजांनी दाखवून दिलं आहे की संपूर्ण हिरवा वरवंटा महाराष्ट्रावर येत असताना त्याच्या चिंधड्या उडवायचं ऐतिहासिक काम महाराष्ट्राने केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने. आपण तिच परंपरा घेऊन चाललो आहोत.

अग्नीपथवरून केंद्राला फटकारले

नोटाबंदी झाली. तेव्हा हू का चू कुणी केली नाही. तेव्हा कुणी काही बोलले नाही. त्यामुळे तो पचून गेला. त्यानंतर शेतकरी कायदे आले. तेव्हा शेतकऱ्यांनी धाडस दाखवलं. मेलो तरी चालेल पण घऱी जाणार नाही. नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावं लागलं. आता हे नवीन टुमणं. अग्नीवीर. नावं मोठं द्यायचं. एकतर अशी वचनं द्यायला हवी जे आपण पूर्ण करू शकू. शिवसेनेने आजपर्यंत का त्याच दमाने पुढे चालली आहे. आम्ही वचन देऊन पूर्ण केलं नाही असं झालेलं नाही. आम्ही कधी एवढ्या नोकऱ्या देऊ हे करू अशी खोटी वचनं दिलेली नाहीत. ही योजना आणायच्या त्याला मोठी नावं द्यायची. या अग्निवीरांना काय शिकवणार तर सुतारकाम, ड्रायव्हिंग. पण या योजनेचं नाव अग्नीवीर. तीन चार वर्षानंतर यांच्या नोकरीचा नाही पत्ता. आपल्याकडे हे वय शिक्षणाचं असतं. ऐन ऐन उमेदीच्या वयात तुम्ही त्याला मृगजळ दाखवणार. त्याच्या मागे तुम्ही त्यांना धावायला लावणार. दहा टक्के आऱक्षण देऊ. त्यापेक्षा भयानक म्हणजे भाडोत्री सैन्य काय हा प्रकार आहे? भाडोत्री राज्यकर्ते आणू, आणा टेंडर, भाडोत्री मुख्यमंत्री, भाडोत्री पंतप्रधान आणू. हेच भाडोत्री प्रकार असेल तर सगळंच भाडोत्री ठेवा. देशाच्या युवकांच्या भवितव्याशी खेळायचं तर का नाही त्यांनी भडकायचं. त्यांनी तुम्हाला मत दिलं असं नाही ते आयुष्य असतं. माझ्या कुटुंबाचं आयुष्य तुमच्या हातात देतो.

सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचे कौतुक

56 वर्षाच्या वाटचालीत अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं. त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांनी ते केलं नसतं तर आज हे वैभव आपण पाहू शकलो नसतो. एका गोष्टीचं मला अभिमान आहे की ती जी मी पिढी म्हणतो त्यातले सुभाष देसाई व दिवाकर रावते आहेत. शिवसेना प्रमुखांचे साथी आहेत. समोर काही नसताना हे शिवसेना प्रमुखांसोबत होतो. शिवसेनेचा पहिला महापौर निवडून येणं हे एक स्वप्नवत होतं. पण त्यानंतरची पुढची 25 वर्ष व आताही ही काही वर्ष शिवसेनची महापालिकेवर सत्ता आहे. आता आपलाच मुख्यमंत्री आहे, आमदार खासदार आहेत. मंत्रीपद आपल्याकडे आहेत. अशावेळेला मी सुभाष देसाई व दिवाकर रावते यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाही दिली. पण रुसवे फुगवे न दाखवता दोघेही त्याच उमेदीने व जिद्दीने. जणू काही शिवसेनाप्रवेशासाठी आले आहेत अशा उत्साहाने आज इथे आले आहेत. याला म्हणतात शिवसैनिक. दुसऱ्यासाठी स्वप्न बघणं व ते साकारण्यासाठी झटणं याला म्हणतात शिवसैनिक. हे वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत. तरीही ते मला आपला नेता मानून आजसुद्धा काम करतायत ते त्यांचे मोठेपण आहे. असं समजू नका तुम्ही निवृत्त झाले आहात. मला प्रत्यक्ष शिवसेनेसाठी तुम्ही नेहमी हवे आहात, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचे कौतुक केले.

शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत : संजय राऊत
शिवसेनेचा ५६वा वर्धापनदिन आहे. अब तक ५६ और भी आगे जाएंगे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, ५६ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या स्थापनेवेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी शिक्का मारण्यात आला. पण बाळासाहेबांनी प्रादेशिक पक्षांची जी मुहूर्तमेढ रोवली, त्यानंतर देशभरात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचे राजकारण उभे आहे. एक प्रादेशिक पक्ष काय करू शकतो हे शिवसेनेने दाखवून दिले. शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे.

वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेचा टीझर
शिवसेनेने टीझर प्रदर्शित केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील,‘भगवा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा,’ या वाक्याने टीझरची सुरुवात आहे. शिवसेनेचे हिंदुत्व साफ है, रघुकुल रीति सदा चली आयी, प्राण जाय पर वचन ना जाय. ‘हृदयात राम आणि हाताला काम असे आमचे हिंदुत्व आहे,’ असेही या टीझरमध्ये म्हणण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: