मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी

 

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाने बॅटिंग सुरु केली असून मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात कालपासूनच मान्सून सक्रिय झाला असून, जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आज पावसाचा जोर कायम असून जिल्ह्याच्या विविध भागात तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे.

आजएकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे.

राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.

Team Global News Marathi: