वीज कापली म्हणून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीने वायरमनला केली मारहाण

 

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येत असल्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून अशातच बारामतीमध्ये थकित वीज बिलामुळे वीज कनेक्शन बंद केलेल्या वायरमनला राष्ट्रवादीच्या एका महिला पदाधिकाऱ्याने मारहाण केली. या महिलेविरुद्ध तालुका पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरणमधील तांत्रिक कर्मचारी मल्हारी विश्वनाथ चव्हाण या तांत्रिक कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या कर्मचाऱ्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सूर्यनगरी हद्दीतील माऊली रेसिडेन्सी येथे सामुदायिक वीज कनेक्शन आप्पासाहेब मारुती राणे यांच्या नावे आहे. हे वीज कनेक्शन थकीत बिलामुळे बंद केले.

वीज कनेक्शन तोडल्यामुळे या सोसायटीमध्ये राहणाऱ्या या महिलेने मल्हारी विश्वनाथ चव्हाण यांची कॉलर धरून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नाहीतर वायरमन चव्हाण यांना विनयभंगाची खोटी केस दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर चव्हाण यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि घडलेली सगळी हकीकत सांगत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास महिला फौजदार श्रीमती शेंडगे करीत आहेत.

Team Global News Marathi: