पोटनिवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी ठाम ! अजित पवारांनी जाहीर केली भूमिका

 

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्‍यता मावळली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे या ठिकाणी तब्बल आठजण इच्छुक असून आम्ही ही निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईत आज बैठक होत असून या बैठकीतच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. जागेसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे.

भारतीय जनता पक्षाकडून चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष ही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. चिंचवडची पोटनिवडणूक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाची समजली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे स्थानिक पदाधिकारी तयारीला लागले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक लढविण्याबाबत ठराव करून राज्यपातळीवरील नेत्यांकडे पाठविला होता. त्यावर राज्य पातळीवर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका पाहता ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच अजित पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केलेल्या घोषणेमुळे बिनविरोध निवडीची शक्‍यता मावळली आहे

Team Global News Marathi: