विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर फडणवीसांचा सरकारवर निशाणा

 

मुंबई | मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणजोत मालवली होती. त्यांचे पुत्र गणेश जाधव यांनी ही दु:खी बातमी दिली. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना काही वर्षांपूर्वी शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा त्या आत्महत्येच्या घटनेची चर्चा झाली. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी होते. ते शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते.

मंत्रालयाच्या गेटजवळ येऊन सुभाष जाधव यांनी छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी सरकारकडे कुठलिही व्यवस्था उरलेली नाही. ज्या प्रकारे अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होत आहेत की, त्यांना गरिबाकडे पहायला फुरसत नाही. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय हे सरकार घेत नाही. आत्महत्या मोठ्य़ा प्रमाणात वाढत आहेत. शेतकऱ्याचा प्रश्न त्याच्या मृत्युनंतर तरी सोडवला पाहिजे. त्यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: