फार्मा कंपनीच्या मालकाला अटक, फडणवीस, दरेकर आणि लाड पोलीस स्थानकात दाखल !

 मुंबई :  सध्या संपूर्ण राज्यभरात मोठया प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढलेली आहे. याच इंजेक्शनवरून राज्यातील वातावरण सुद्धा तापलेले दिसून येत आहे. त्यातच काल मध्यरात्री रेमडेसिवीर इंजेक्शनचा 60 हजार वायलचा साठा असल्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला रात्री उशीरा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

ही बातमी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिळताच ते स्वतः पोलीस स्थानकात दाखल झाले होते. तसेच त्यांच्या सोबत प्रवीण दरेकर, भाजपनेते प्रसाद लाडदेखील तेथे पोहचले. यावेळी राज्याला रेमडेसिवीर देऊ करणाऱ्या फार्मा कंपन्यांना आघाडी सरकार त्रास देत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून राज्याला 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

दरम्यान, राज्यातील गरजू रुग्णांसाठी जी फार्मा कंपनी रेमडेसिवीर देण्यास तयार होती. तिला राज्य सरकारडून त्रास दिला जात आहे. राज्याच्या मंत्र्यांकडून आपत्कालातही राजकारण सुरू आहे. मंत्र्याच्या खाजगी सचिवांकडून त्यांना धमक्या दिल्या जात आहे. असा घणाघाती आरोप फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. आता या टीकेला आघाडीचे मंत्री काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: