“पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु”

 

राज्यात आघाडीचे सरकारं स्थापन झाले असले तरी या तिन्ही पक्षातील मतभेत काही लपून राहिलेले नाही. त्यातच जुन्नर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आमदाराला टोला लगावला आहे. शिवसेनेचं बहुमत असूनही खेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत शनिवारी खेड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र खेडमध्ये जे किडे वळवळ करत आहेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करु, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

भाजपनं युतीत गद्दारी केली. त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेलो. तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात, आम्ही तुमचं सरकार पाडलं, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधलाय. खेडमध्ये पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल, असा थेट इशारा राऊतांनी दिलीप मोहिते यांना दिलाय. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन राऊतांनी केलं. मास्न न लावलेलं उद्धवजींनी पाहिलं तर आपली चंपी करतील, आधी माझी आणि नंतर तुमची.

Team Global News Marathi: