राज्यात सध्या मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. त्यातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद होताना दिसत आहे.
एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केलं आहे. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली आहे.
“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही.
तसेच आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.