पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल – आदित्य ठाकरे

 

कोल्हापूर | माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये पुणे विभागाचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे, याच पद्धतीने सर्वांनी चांगले काम केल्यास पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल, असा विश्वास पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला. “माझी वसुंधरा अभियान” बाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे महसूल विभागाची बैठक कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, “माझी वसुंधरा अभियान” राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. पर्यावरण रक्षणासाठी या अभियानांतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. या अभियानाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून यात जनसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. या अभियानात शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण, वयस्कर अशा सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी करुन घ्यावे, जेणेकरुन हे अभियान लोकचळवळ होईल.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, हे अभियान लोकप्रिय मोहीम होत आहे. विभागातील सर्व जिल्ह्यांनी खूप चांगले उपक्रम राबवले असल्याबाबत कौतुक करून या कामाची एकत्रित पुस्तिका तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण रक्षणाच्या कामात प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबत आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होईल. प्रशासनाच्या वतीने विकास कामांचे नियोजन करताना या कामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबतही अभ्यास करावा, जेणेकरुन पर्यावरणाचे रक्षण होईल. पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रण यासाठी विभागीय स्तरावर समिती नियुक्त करावी. तसेच याविषयीच्या आवश्यक त्या सूचना राज्य शासनाला सादर कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: