ज्ञानदेव वानखेडे यांची माझ्या विरोधात खोटी अवमान याचिका!

मुंबई | माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माझ्या विरोधात खोटी अवमान याचिका दाखल केली आहे. आपण वानखेडे व त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही तसेच कोर्टाच्या आदेशाचाही अवमान केलेला नाही. त्यामुळे माझ्या विरोधात दाखल केलेली अवमान याचिका फेटाळून लावा अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र नवाब मलिक यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले.

खटल्यावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही बदनामीकारक वक्तव्य करणार नाही अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाला दिली होती मात्र मलिक यांच्या कडून आपल्या विरोधात बदनामीकारक आरोप सुरूच असून २८ डिसेंबर रोजी ट्विटर आणि 2 व 3 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत बदनामी केल्याचा आरोप करत वानखेडे यांनी मलिकांविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.

कोर्टाचा आदेश न पाळल्यामुळे मलिकांवर कारवाई करावी तसेच याचिकेचा दंड वसूल करावा अशी मागणी वानखेडे यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने मलिक आज जातीने मुंबई उच्च न्यायालयात हजर होते. तेव्हा मलिक यांनी अॅड. फिरोज भरुचा यांच्या मार्फत आज न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले व स्वतःवर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Team Global News Marathi: