मुंबई | उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. जवळपास २८ तासांपेक्षा जास्त काळापासून हे धाडसत्र सुरु आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे आयकर विभागाचे कर्मचारी सर्व तयारीने आले असून, हे धाडसत्र आणखी काही काळ चालणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. सात ते आठ अधिकाऱ्यांनी कालची रात्र पार्थ पवार यांच्या ऑफिसमध्येच घालवली. त्यानंतर आज सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात झाली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, तसेच नातेवाईकांच्या मुंबई, गोवा, सातारा, पुणे, बारामती इथल्या कंपन्यांवर आजही आयकर विभागाकडून छापेमारीची शक्यता आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.