पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथाच्या दर्शनाला

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज उत्तराखंड राज्यातील केदारनाथ आणि बद्रीनाथ धामाच्या दर्शनाला जात आहेत. आज सकाळीच मोदींनी केदारनाथाचे दर्शन घेतले. यादरम्यान मंदिरासह परिसराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात अली होती. केदारनाथचे दर्शन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येथील विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मंदिराच्या परिसरात 200 मीटर पर्यंत बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. मोदी यांचा हा सहावा केदारनाथचा दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते केदारनाथाची पूजा करण्यात आली. तसेच विश्वशांती आणि विश्व कल्याणासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गर्भगृहात पंचामृताने महाअभिषेक करण्यात आला, अशी माहिती केदारनाथ मंदिर समितीचे मुख्य पुजारी गंगाधर लिंग यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ आणि बद्रीनाथ धाममध्ये गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे . येथील जिल्हाधिकारी मयूर दीक्षित यासाठी परिश्रम घेत आहेत.केदारनाथाचे मंदिर 10 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

केदारनाथ येथील रोपवे प्रकल्पाचे भूमीपूजन मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोनप्रयाग ते केदारनाथ धामापर्यंत म्हणजेच 13 किलोमीटर हा रोपवे असेल.या मार्गात चार स्टेशन असतील. जेणेकरून प्रवाशांना सहजपणे मधल्या स्टेशनवर उतरता किंवा चढता येईल. 2,430 कोटी रुपये निधी खर्च करून हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या रोपवेचे भूमिपूजन झाल्यानंतर मोदी मंदाकिनी आस्थापथ आणि सरस्वती आस्थापथ प्रकल्पांचा आढावा घेतील.

Team Global News Marathi: