पंकजा मुंडे यांना पुन्हा डच्चू ; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ही पाच नाव जाहीर

 

राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले आहे. मागील काही काळापासून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्यामुळे मुंडे समर्थक नाराज आहेत.

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यानंतर 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आज पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. हे पाचही उमेदवार आजच अर्ज दाखल करणार आहेत. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, असेही पाटील यांनी सांगितले. विधान परिषदेसाठी आम्ही पाचवी जागा जिंकून आणणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. राम शिंदे हे याआधी कर्जत-जामखेडचे आमदार आणि फडणवीस यांच्या सत्ताकाळात मंत्री होते. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहीत पवार यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला होता. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत यंदा संपली. त्यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. प्रसाद लाड हे भाजपचे पाचवे उमेदवार असणार आहेत.

Team Global News Marathi: