बीड | कोरोना संसर्गाचे संकट कमी होत असताना राज्यभरात शाळा महाविद्यालय, मंदिरे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी कोरोनाचे नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर सध्या दसरा मेळाव्याच्या तयारीने वेग घेतला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षी हा परंपरागत दसरा मेळावा प्रचंड जनसागराच्या साक्षीने मोठया उत्साहात पार पडत असतो, यंदाच्या या मेळाव्याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
येत्या १५ तारखेला दसरा आहे, त्या अनुषंगाने ‘आपला दसरा, आपली परंपरा’ जपण्यासाठी संपूर्ण सावरगांव नगरी सज्ज होत असून सर्व ग्रामस्थ एकजुटीने कामाला लागले आहेत. मेळाव्याच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांच्या राज्यभरात ठिक ठिकाणी बैठका सुरू आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडेनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती ती परंपरा पुढे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी अखंडपणे सुरू ठेवली आहे.
मागील वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचे सावट काही अंशी दूर झाले असून मंदिरे उघडली आहेत, शिवाय सर्व जाहीर कार्यक्रम देखील होत आहेत, त्यामुळे हा मेळावा पुन्हा पहिल्या सारखा पार पडेल अश्या जनसामान्यातून प्रतिक्रिया येत आहेत.