नाशिक | १० जून रोजी राज्यसभा निवडणूक होत असून त्यानंतर २० जून रोजी राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना यावेळी विधान परिषदेवर संधी मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. परंतु त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंकजा मुंडे यांचे स्टेटमेंट वाचले होते.. दिलेल्या संधीचं सोनं करेन. परंतु त्यांना डावलण्यात आले आहे. त्यांना पहिल्या क्रमांकावर उतरता आलं असतं. संधी द्यायला हवी होती. खडसेंच्या बाबतीत तेच झालं होतं. पंकजा मुंडे यांना परत घेतलं जाईल वाटलं होतं. परंतु असं काही झालं नाही. याचा परिणाम हा लोकांवर व समाजावरही होत असतो,” असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलं.
“भाजपने राज्यसभा निवडणुकीत जास्त उमेदवार दिला. मात्र आघाडीचे उमेदवार निवडून येतील. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही तयारी करावी लागेल, कंबर कसावी लागेल. महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभेवर सर्व निवडून येतीलच आणि त्याच पावलावर पाऊल टाकून विधान परिषदेतही आघाडीचे उमेदवार निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना भुजबळांनी व्यक्त केला.