राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष अधिक वाढलेला दिसून आला होता. त्यातच आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचादेखील आज वाढदिवस आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल ट्विटरवर भावनिक पोस्ट शेअर करत आदरांजली वाहिली. तसेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. याच गोष्टीचा धागा पकडत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपले भाऊ धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? असा सवाल पंकजा यांनी केला आहे.
“स्वतःचा वाढदिवस आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का? हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली.
“किती मोठ्या कमानी लावल्या, कितीही मोठ्या रांगोळ्या काढा, किती मोठे कटआउट लावले, जाहिराती दिल्या, त्यात गरिबाला काय मिळालं? याचा विचार करावा”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. गोपीनाथ गडावर आयोजित लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्या बोलत होत्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.