रातराणी. .. यात दोष कूणाचा? बदलत्या गरजांचा, जाणिवांचा, अपेक्षांचा ?

रातराणी. …….

एकूण “साकेत”चे सध्या छान चालले होते. मूळात साकेत, हे कूणालही न उलगडलेले व्यक्तीमत्व. .पण त्याचे उत्तम चालू होते., इतके की तो स्वत:वर खुष होता, समाधानी होता, निदान तसा तो दाखवत होता ,असावा. हा कधीकाळचा पोरगा आज वयाची पन्नाशी पार करुन बसला होता…

वयाने वाढून तो खरे सांगायचे तर तो त्याच्या भुतकाळात जास्त रमायचा, त्याला वर्तमान मान्य नव्हता…कारण त्याला त्यातले काहीच पसंत नसावे….त्यामूळे हा ब-याच वेळा रुक्ष असणारा, पण आजही काहीतरी अपील असणारा साकेत ! त्याचा एक जमाना होता याची साक्ष त्याला भेटल्याशिवाय येतच नाही…स्वभावाने खुप गोड, देखणा, कलाकार.. पण परिक्षेत कधीही 50/55 टक्कयावर गेला नाही.

रोज येणारा, आज जगणे हेच त्याचे सूत्र. ..त्यामूळे परिक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचा. त्यावेळी प्रत्येक गोष्टीत रस घेणा-या साकेतच्या आजूबाजूला सतत मूलींचा घोळका असायचा….पण हा त्यावेळी कुण्या वेगळ्या मूलीतच गुंतला होता…आणि कदाचित आजही आहे. तेच त्याचे पहीले प्रेम घेऊन तो आजही जगतो आहे ही गोष्ट अलहिदा.
काळानुरूप आयुष्य बदलत गेले..जसे सर्वांचे बदलते तसेच…पण साकेत तसाच होता. आयुष्यात टक्केटोणपे खात.. पण बदलायला तयार नव्हता स्वत:ला ! तेव्हा अन आजही!

साकेतच्या नशिबी कधीही आभाळातले इंद्रधनुष्य नव्हते व आजही नाही….कारण त्याच्याबाबतीत सर्वांनीच तो एक “प्ले बॉय” होता व आहे, हे जणू मान्य केलेले होते…पण मी ते आजही मान्य करत नाही. साकेतने जिच्यावर जिवापाड प्रेम केले, लग्न केले… ते लग्नही टिकले नाही याची चर्चा आजही इतक्या वर्षांनी होतच आहे या गोष्टीची आजही मला चिड आहे.. दिलफ़ेक आशिक म्हणून ज्याला कायम हिणवले गेले तो आजही “प्रेम”या गोष्टीत प्रचंड रिता आहे, कोरड्या, खोल विहीरीसारखाच.

प्रेमभंग, लग्नभंग होऊनही तो उभा राहिला तो त्याचा उत्तम अभिनय आहे, होता असेच मी म्हणेन….नंतर नंतर तो सतत आपल्या कोषात राहायचा. एकटा! त्याच्या आयुष्यातील प्रेम, संगीत,कला सगळ्या गोष्टी संपल्यासारख्या ! पुढे अनेक वर्ष गेली … अन अचानक तो फेसबूकवर झळकला तो काहितरी वेगळी उर्जा घेऊनच….बघता बघता तो फ़ेसबूकवर राज्य करायला लागला . त्याच्या कविता लोकांना विलक्षण आवडू लागल्या होत्या ……लाईकस व कॉमेन्टसचा पाऊस पडत होता त्याच्या पोस्टवर.. त्याच्या कवितेत काहीतरी वेगळे होते व आहे, तो काही प्रणय गीते न लिहीता आयुष्यावर लिहीत होता…मी ते अनुभवत होतो

..पुरुषांपेक्षा त्याच्या कमेंट लिस्टमध्ये बायकांचा भरणा जास्त होता हे ही मला कळत होते ..थोडक्यात साहेब हिट होत चालले होते. ..मी काय व इतर काय..फेसबूक, इंस्टाग्राम वापरतो पण बायका, मूली आमच्या लिस्टमधे नाहीच….पण या गोष्टिंचा आनंद घेण्यापेक्षा त्याला जुन्या जखमाच कुरवाळायला का आवडतात हे देव जाणे!

या सगळ्या व्यापात त्याचे खरे व्यक्तीमत्व उफाळून यायचे…मग कुठल्यातरी कमेंटवर रसरसून प्रेमही करायचा…पण ते प्रेम नव्ह्ते तर होते फक्त मृगजळ. ..पण हा कधीकधी त्या मृगजळाच्या पाण्याने तहान भागवायचा प्रयत्न करायचा …त्यात काही राम नाही हे त्यालाही कळायचे, पण नंतर.

असेच एकदा साकेतला फेसबूकवर एका स्त्री ची फ्रेंडस् रिक्वेस्ट आली. चेहरा आकर्षक आहे ही नोंद करुन ती त्याने स्विकारली व विसरुन गेला…काहीदिवसातच फ़ेसबूक वरिल तिच्या हाकेला त्याने मनापासून “ओ” दिली, मग मेसेज ची देवाणघेवाण चढत्या उन्हासारखी वाढत गेली…दरम्यान साकेत तिचा अभ्यास नकळत का करत गेला याचे उत्तर आजही त्याच्याकडे नाही हे पक्के माहित आहे मला…सुरवातिस ऑव्हरस्मार्ट वाटणारीचे नाव होते “निशा”.

अहोजाहो वरुन अरेतुरे वर केंव्हा दोघे येऊन एकमेकांच्या प्रेमात कसे पडले ते कळलेच नाही… त्यांच्यात मित्र मैत्रिण असे काही नाते नव्हते.. कारण स्त्री पूरुष निव्वळ मित्र असु शकतात ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास नाही. Platonic Love असल्या गोष्टी तो अती बुद्धिमान लोकांची नाटके समजतो…….देहापलिकडचे प्रेम हे फक्त वयस्कर जोडप्यांतच शक्य आहे अशी त्याची धारणा आहे…असो.

रातराणी (निशा) व साकेत आता दोघे खुप रमू लागले होते… बोलू लागले होते……….एखादा झरा उपसावा तसे दोघे आठवणी उपसत होते… दोघांची गरज ही रोजच्या संवादातून पुर्ण होत असावी.. थोडक्यात हा वाघ आता माणसाळु लागला आहे असेच चित्र होते. …पण त्याची काळजी वेगळी होती…कारण रातराणी, विवाहीत होती…अन त्याला ते पाप वाटत होते…त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील एक वेगळी विफलता त्याच्या लक्षात येत होती…आजही अनेक जोडप्यांमधे हा प्रॉब्लेम आहे..

नुसते एकत्र राहतात..इतरांसमोर जणू “एक दुजेके लिये” असेच वागतात, मारुन मूटकून तसा अभिनय देखिल करतात…शरीराची गरज म्हणून तेवढ्यापूरते एकत्र येतात व त्याला प्रेमही म्हणतात. टोकाच्या क्षणी मी तुझ्याकरता हे केले, ते केले असे भांडतातही…खरं तर हा मोठा विषय ! यात दोष कूणाचा? बदलत्या गरजांचा, जाणिवांचा, अपेक्षांचा ? का संसार करणा-या दोन ठार बहि-यांचा ? हे आपण नाही शोधायचे…तर हा दोष चांदण्याचा
अशीच आपली समजूत करुन घ्यायची. असो.

खरंतर साकेत आणि निशा (रातराणी) एकमेकांना पुरक होते, तो थोडा रागिट, खडूस पण ती त्याला समजून घेत असावी…थोडक्यात दोघेही आपल्या आयुष्यातील हरवलेली सूत्र एकत्र बांधत होते…अर्थात दोघांत प्रचंड आर्थिक अंतर होते…अन त्या दृष्टीने नेमका साकेत अस्थिर होता…तरीही दोघांनी एकमेकांना भेटावे, “अवघा रंग एकची व्हावा”! असे साहजिकच दोघांना वाटत असावे…पण ते शक्य दिसत नव्हते त्याची कारणे अनेक होती.

साकेत एकदा का त्याची मैफल सजवायला बसला की त्याला अंत नसतोच ना कुणाचे सोयरसुतक ! त्याला मदिरा फार प्रिय…”व्होडका” त्याचा जीव की प्राण. ..त्यादिवशी, रविवारी, त्या बारमधे मी नेमका टपकलो. ..तेव्हा साहेबाचे व्होडकायन रंगात आले होते, अशावेळी साकेत खुप तत्वज्ञान, शेरोशायरी …आरती प्रभु, सूरेश भट, ग्रेस पासून तो अगदी इलाही जमादार ते राहत इंदोरी यांच्यापर्यंत सफर घडवून आणतो. याचा अर्थ त्याला दारु लागली असे बिलकुल समजायचे नाही…त्याची आयुष्यातील वेगळी मते पचवायला अवघड असली तरी इतके वर्षे संसार करुन मलाही विलक्षण पटतात.

तर मी त्याच्या टेबलवर बसल्या वर, एक दोन राऊंड झाले…तेव्हा मी अलगद रातराणीचा (निशा) विषय काढला तेव्हा थोडा अस्वस्थ झाला तो अन ते साहजिकच असावे…वयाच्या 55 व्या वर्षी घडणारी प्रेम कहाणी ऐकायला, पचवायला अजून आपला समाज तेवढा तयार आहे का नाही याबद्दल मी आजही साशंक आहे, असो.

साकेत , निशाच्या बाबतीत पुढे गेला आहेस तर व्हा रे आता एक!
लहान नाही राहीलास तू ! पन्नाशी
गेली रे ऊलटून तूझी, माझी आणि तिचीही.
हे एकून त्याने त्याचा नवा पेग भरला अन एका दमात संपवला… मला म्हणाला, “राहूल. ..रातराणी माझ्या अंगणात नाही, ते दुस -याच्या अंगणातले फुलझाड आहे….रातराणीचा सुग्ंध माझ्या मनाच्या अंगणात दरवळत आहेच, त्यासाठी त्या अंगणात जायची मला गरज नाही, मी तो सूवास घेईन..पण ज्याने ते रोप वाढवले, निगा राखली त्याच्या अंगणात घूसून मला ते झाड उप टून माझ्या अंगणात लावायचा कुठलाही हक्क मला पोहचत नाही, राहूल !

असे म्हणून एका हाताने माझेही बिल देत, दुस-या हाताने शेवटचा पेग “वन फॉर द रोड” म्हणून दमात रिकामा करुन तो बारच्या बाहेर गेलाही…..

माझ्याच टेबलावर अनोळखी रिंग टोन वाजली तेव्हा लक्षात आले की साकेत फोन विसरला आहे…मी तो फोन उचलत त्याला द्यायला त्याच्या मागे निघताना सहज फोनच्या स्क्रीनवर बघितले, तो रातराणीचा दिवसभरातला त्याने न उचललेला बावीसवा मिसकॉल ठरला होता.

© ®
Raju Kulkarni
डोंबिवली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: