अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

 

केस दाबण्यासाठी सरकारचा आशीर्वाद
देशामध्ये लोकशाही आहे
कुणीही शूटिंग वगैरे बंद करू शकत नाही

मुंबई । “अभिनेत्यांबद्दल एखादे वक्तव्य केले तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते हे माहीत आहे. त्यामुळे ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचे काम चालू आहे”, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र डागले. काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढीवरून टीका करणारे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे आता शांत का बसले ? अशी विचारणा करत त्यांचे शूटिंग महाराष्ट्रात चालू देणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट घेतली. त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर, गिरीश महाजन देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी मराठा आंदोलकांची देखील भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंधन दरवाढीवर शांत बसलेल्या अभिनेत्यांना नाना पटोले यांनी थेट इशारा दिला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्धी करता अशा प्रकारची वक्तव्य केली जातात. अभिनेत्यांबद्दल एखादे वक्तव्य केले तर दिवसभर आपली प्रसिद्धी चालते हे माहित आहे. ‘बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ’ अशा प्रकारे कशावरही प्रसिद्धी मिळवण्याचे काम चालू आहे. याला फार गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. असे कुणीही शूटिंग वगैरे बंद करू शकत नाही.यामध्ये देशामध्ये लोकशाही आहे, असे म्हणत त्यांनी पटोलेंना सुनावले.

केस दाबण्यासाठी सरकारचा आशीर्वाद

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी बोलताना राज्य सरकारच्या आशीर्वादाने पोलिसांकडून केस दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. सगळे पुरावे समोर आहेत. यवतमाळच्या रुग्णालयाचा पुरावा देखील समोर आलेला आहे. मात्र पोलिसांना ही केस दाबवण्याचे सर्व आदेश सरकारकडून आले आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

शिक्षकांसंदर्भात अनुदान देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता. त्याची तरतूदही केली होती. गेल्या सव्वा वर्षात या सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. आतापर्यंत ६० टक्क्यांचे अनुदान व्हायला पाहिजे होते. ४० टक्क्याचा टप्पाही सरकारने जाणीवपूर्वक दिलेला नाही. एकीकडे सरकार बिल्डरांना ५ हजार कोटींची सूट देते आणि शिक्षकांचे अनुदान मात्र थांबवते. अधिवेशन सुरू होण्याआधी शिक्षकांचा प्रश्न सोडवा. अन्यथा हा विषय आम्ही लावून धरू आणि अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: